नायगाव तालुक्यात मुरुमाचे अवैध उत्खनन जोमात..!! महसूल प्रशासन कोमात..!!
नायगाव/प्रतिनिधी
निवडणुकीच्या धामधुमीत माफीयांनी मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध उत्खनन सुरु केले आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून काहींनी राजरोसपणे मुरुमाची चोरी करुन दिवसाढवळ्या विक्री करत आहेत. या प्रकरणाची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना असताना कुठलीच कारवाई होत नाही हे विशेष. विशेषतः या मुरुमाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीत तलाठी व मंडळ अधिकारी अप्रत्यक्ष माफीयांना मदत करत आहेत.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
नायगाव तालुक्यात मुरुम चोरट्यांनी मोठा उच्छाद मांडला असून नायगाव परिसर हा चोरट्यांचा अड्डा बनला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्रीला मुरुमाची चोरी करुन वाहतूक करत आहेत. नायगाव तालुक्यातील गौण खनिजाच्या अवैध उत्खननाकडे तहसीलदार व त्यांची यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महसूल विभागात वरपासून ते खालपर्यंत भ्रष्टाचाराची गटारगंगा जोरात वाहत असल्याचे दिसून येत आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीत कोण कोण आहेत आणि त्यांना पाठबळ कोण देतय याची चर्चा तालुकाभर होत आहे. नायगाव तालुक्यात होत असलेल्या मुरुम व वाळूच्या अवैध वाहतुकी संदर्भात तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना माहिती दिली असता ते केवळ तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांना सांगते एवढच म्हणतात पण पुढे काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे यात आर्थिक तडजोड तर निर्माण होत नाही ना यात शंका निर्माण होत असून, परिणामी महसूलच्या पाठींब्यावर नायगाव तालुक्यात मुरुमाचे अवैध व नियमबाह्य प्रचंड उत्खनन करून बिनधास्तपणे वाहतूक करण्यात येत आहे. तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदाराशी अर्थपूर्ण तडजोडी करुन राक्षसी पध्दतीने हजारो ब्रास मुरुमाचे नियमबाह्य व अवैध उत्खनन करण्यात येत आहे.
नायगाव तालुक्यात मागच्या एक महिण्यापासून मुरुमाच्या अवैध उत्खनन व वाहतुखीचा गोरखधंदा सुरु आहे. पुर्वी रात्रीला लपूनछपून चोरी करण्यात येत होती. मात्र मागच्या एक महिण्यापासून अवैध मुरुमाची दिवसाच वाहतूक होत आहे. महसूल विभागाने मुक समंती दिल्यामुळे राक्षसी पध्दतीने मुरुमाचे अवैध उत्खनन करुन वाहतूक होत आहे. महसूल विभागाच्या मौनवृती मुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे.