“शरद पवार इन्स्पायर फेलोशिप 2025”- साठी दीपक भांगे यांची निवड..
नांदेड/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने “शरद पवार इन्स्पायर फेलोशिप 2025” ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून,सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक दिपक गुरूबसअप्पा भांगे यांची निवड झाली आहे. एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची नायगाव तालुक्यातल्या अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत ओळख असून या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या इन्स्पायर फेलोशिप साठी कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यातील नेतृत्वासाठी प्रेरित केले जाते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप हा अत्यंत प्रतिष्ठित सन्मान असून तो शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टतेला चालना देतो आणि शिक्षकांना त्यांच्या समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरित करतो.
राष्ट्रीय शैक्षणिक २०२० धोरणातील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून व विद्यार्थ्यांचा गरजा लक्षात घेऊन दीपक भांगे यांच्या “ऑस्ट्रॉनॉमि क्लब -तारे ग्रह आणि त्या पलीकडील ब्रम्हांडाची सफर”. या उपक्रमाची शैक्षणिक फेलोशिप साठी निवड करण्यात आली असून त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन त्यांना येत्या आठ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉईंट मुंबई येथील कार्यक्रमात फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे, जी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना पुढे नेण्यासाठी व वैयक्तिक विकासासाठी वापरली जाईल.
त्यांची ही निवड त्यांच्या अनेक यशामध्ये भर घालणारी आहे.याआधी त्यांना 2023 चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे, बरबडा केंद्रप्रमुख पंडित ढगे, इज्जतगाव शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव यांच्यासह संपूर्ण शिक्षण क्षेत्र त्यांच अभिनंदन करीत आहे.