प्रा.शिवाजीराव हंबर्डे यांचे निधन..
नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.शिवाजीराव भगवानराव पा. हंबर्डे यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान निधन झालं आहे.सकाळी आठ वाजता छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल केल असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.ते ४८ वर्षाचे होते.त्यांच्या निधनामुळे जवाहरलाल नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रा.शिवाजीराव हंबर्डे हे परिचित होते. विद्यालयातील सर्व कार्यक्रमात ते मोठ्या हिरीरीने सहभागी व्हायचे.मराठी विषयावर त्यांच विशेष प्रभुत्व असल्याने आणि दमदार आवाजाच्या शैलीमुळे ते विद्यार्थी प्रिय बनले होते. विद्यालयातील साहित्य संमेलन, व्याख्यान, सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमात उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी ते पार पाडायचे. त्यांच्या निधनामुळे विद्यालयातला एक उत्तम हिरा गमावला असल्याची भावना विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्राध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
अत्यंत मनमोकळा स्वभाव असलेले प्राध्यापक शिवाजीराव हंबर्डे यांचा शाळेतील सर्व स्टाफ सोबत अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होताच.परंतु काही सोबत त्यांचे अत्यंत कौटुंबिक नाते होते. त्यापैकीच त्यांचे अत्यंत विश्वासू मित्र विद्यालयातील वरिष्ठ लिपिक असलेले सदाशिव कवळे यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने सकाळी सात ते साडे सात वाजता त्यांनी फेसबुकवर सदाशिव कवळे यांच्या मुलाला शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यामुळे सर्वांच्या मनाला ही गोष्ट चटका लावणारी ठरली. परिसरातील अनेक जण त्यांचं फेसबुक अकाउंट चेक करून भावनिक होताना दिसून येत होतं.एक तासापूर्वी फेसबुक वर शुभेच्छा देणारी त्यांची ती पोस्ट शेवटची ठरल्याने अनेकांचं मन गहिवरून आल्याने हळहळ व्यक्त होत होती.प्रा.शिवाजीराव हंबर्डे हे मराठी विषयाचे अभ्यासक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी भाषण कला शिकवली.त्यांच्यामुळे आज अनेक विद्यार्थ्यांनी देखील आपल्या भाषण शैलीवर प्रभुत्व मिळवत चांगले घडले आहेत.त्यामुळे आपल्या आवडत्या शिक्षकांचं अचानकपणे दुःखद निधनाच वृत समजल्यावर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.प्रा.शिवाजीराव हंबर्डे यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,भाऊ,पुतणे,असा परिवार असून शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पाटोदा या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.