परभणी घटनेच्या निषेधार्थ बरबडा बंदला प्रतिसाद
नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
भारतीय संविधानाचा…भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..अशा घोषणा देत, परभणी शहरात झालेल्या संविधानाच्या प्रतीच्या अवमानाच्या निषेधार्थ नायगाव तालुक्यातील बरबडा याठिकाणी आज शनिवार (ता.१४) रोजी सकाळी साडे दहा वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
परभणी येथे झालेल्या संविधान स्मारकाच्या तोडफोडीच्या निषेधार्थ नायगाव तालुक्यातील बरबडा गाव बंदचे आवाहन रा.काँ.सामाजिक न्याय विभागाचे नायगांव तालुकाध्यक्ष अंकुश हणमंते यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केले होते.त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन या “बंद” मध्ये सहभागी झाले.परभणी घटनेच्या निषेधार्थ बरबडा येथील आंबेडकरी अनुयायांनी गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली.या मार्गाने मार्गक्रमण करताना मोर्चेकऱ्यांनी संविधानाच्या समर्थनार्थ विविध घोषणा दिल्या.तसेच हे कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशाही घोषणा देण्यात आल्या.हा मोर्चा मुख्य बस स्टॉप चौकात आल्यावर काही जणांनी भाषणे केली.यावेळी गावातील शेकडो महिला – पुरूषांची उपस्थिती होती.या दरम्यान कुंटूर पोलिसांनी याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.