कहाळा संस्थानात गुरुवर्यावर आधारित तयार केलेल्या 36 श्लोकांचे प्रदर्शन
नायगांव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत संस्थानात सोमवारपासून चंपाषष्ठी उत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. या ठिकाणी श्रीसंत नाना महाराज कहाळेकर( सच्चिदानंद तीर्थ स्वामी महाराज) यांचे समाधी स्थळ आहे.
या ठिकाणी श्री मल्हारी म्हाळसाकांतांनी आपल्या भक्तांसाठी सगुण रुपात येथेच सर्वांना दर्शन दिले व प्रत्येक उत्सवात मी येथे असेल असे सांगीतले.यामुळे या ठिकाणाला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे.म्हणून पंचक्रोशीतील खंडोबाचे हजारो भक्त न चुकता चंपाषष्ठी उत्सवास कहाळ्यास येतात.गेल्या जवळपास तीनशे वर्षापासूनची चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा करण्याची परंपरा आजही (त्यांची सहावी पीढी) गुरुवर्य नीळकंठ महाराज कहाळेकर यांच्या अधिपत्याखाली कायमस्वरूपी सुरू आहे. याच ठिकाणी श्री संत नाना महाराज कहाळेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे 36 श्लोक लेखक देवराव नागोराव कुलकर्णी ( लाटकर गुरुजी रा.मोठी लाट ) यांनी तयार केले आहेत.ते श्लोक त्यांचे नातू नागेश देविदासराव कुलकर्णी यांनी तयार करून कहाळा संस्थान येथे दिले आहेत. त्या श्लोकाचे गुरुवर्य नीळकंठ महाराज कहाळेकर व डॉ. धनंजय महाराज कहाळेकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.
या श्लोकात गुरु श्री संत नाना महाराज कहाळेकर व कहाळा संस्थान विषयीची सविस्तर माहिती आलेली आहे.श्री संत नाना महाराज कहाळेकर यांच्या जीवनात केलेला परमार्थ, शिष्यांवर केलेले अपार प्रेम व कहाळा संस्थान याविषयीचा सविस्तर माहिती या सर्व श्लोकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणून याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे.परमार्थ करताना अनेक चढउतार आपल्या जीवनात येतात. परंतु त्याची पर्वा न करता श्री संत नाना महाराज यांनी आपले जीवन धन्य करून घेतले आहे. श्री संत नाना महाराज कहाळेकर यांनी गोदावरी काठावर जलसमाधी घेतली होती.तेथे असलेल्या गणपती पेंड येथे आजही दरवर्षी दशहार उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. ही परंपरा आजही सुरूच आहे.
श्री संत नाना महाराज कहाळेकर यांचे समाधी स्थळ श्री मल्हारी म्हाळसाकांत महाराज संस्थानात आहे.हजारो शिष्य परिवार आजही चंपाषष्ठी उत्सवानिमित्त दर्शनासाठी कहाळ्यात येतात.श्री संत नाना महाराज यांचे जीवन चरित्र सर्व शिष्यांना समजावे व आदर्श परमार्थ कसा करावा हे श्लोकात समाविष्ट करण्यात आले आहे. हे श्लोक कहाळा येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत संस्थानात लावण्यात आलेले आहे.