हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र
नायगाव/भगवान शेवाळे
आज सकाळी झालेल्या भूकंपाने संपूर्ण जिल्हा भयभीत झाला असून, सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले असून, याची खोली 10 किलोमीटर असल्याची माहिती मिळत आहे.
लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे.यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.